नामदेव बांगर
अहमदनगर : भंडारदरा परीसरात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे रानफुले बहरु लागली आहेत. यामध्ये सोनकी, अग्निशिखा, रानतुर, रानतेरडा, चाईचा मोहर, रानगांजा, श्वेतांबर, मंजिरी, सफेद कोरांटी, तरवड, सोनसरी, मंजिरी, कुसूंबी, उंदरी, घावटी, लाजाळू, लाल गोधडी , घाणेरी, गरिया, कोंबडा अशा विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर काही फुले बहरत असतात तर काही फुले श्रावण महिण्यामध्ये बहरत असतात. धरणीने आता हिरवा शालू पांघरलेला आहे. अशाचवेळी धरतीवर रंगबरंगी फुलांची उधळण होत आहे. यामुळे सृष्टीला वेगळाच बहर आलेला असल्याचे दिसून येते. या फुलांवरती रंगीबेरंगी फुलपाखरे, मधमाश्या, भुंगे फुलांना बिलगतांना दिसत आहेत. अजुनही पाऊस सुरु अल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहत आहेत. ऊन पावसाचा लपंडाव त्यात मध्येच पाऊस यामुळे निसर्गाला वेगळीच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
भंडारदरा-कळसुबाई- हरिश्चंद्र अभयआरण्यामध्ये दर वर्षी लाखो पर्टयक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. रंधा-धबधबा, भंडारदरा धरण (विल्सन डॅम), साधनदरी, घाटघर प्रकल्प, रतनगड, पट्टाकिल्ला अशी विविध प्रकारचे ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे फुले फुललेली असतात. ओढे-नाले भरभरून वाहत असतात. पक्षांचे किल्लबिल्लाट चाललेला असतो. निसर्गाचे नवचैतन्य या काळामध्ये बघवयास मिळत असते.
गेल्या पाच-सहा महिण्यापासून पर्यटक फिरकले नसल्यामुळे पशू-पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते आहे. त्याचबरोबर अनेकवर्षींच्या तुलनेमध्ये फुलांच्या संख्खेमध्ये वाढ झालेली दिसून येते. यावर्षी काजवा महोत्सवासाठी पर्यटक फिरकले नसल्यामुळे हजारो पटींनी काजव्यांची संख्या वाढलेली दिसल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी पडवळे साहेब यांच्या निदर्शणास आली. त्यामुळे ह्यावर्षीपासून वनविभाग काजवा महोत्सवाच्यावेळी योग्य काळजी घेणार असल्याचे सांगितले.

